Happy Music Show Pune

२०१६साली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात Happy music showचा पहिला कार्यक्रम झाल्यापासून, मुंबईत शो करण्याची रवी बापटले यांची इच्छा होती.परंतु योग येत नव्हता.महाराष्ट्रभर ४६ कार्यक्रम झाल्यानंतर परवा १०फेब्रूवारी ला मुंबईतील दादरच्या शिवाजी मंदीर नाट्यगृहात हँपी म्युझिक शोचा ४७वा प्रयोग झाला.या शोला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.एका गाण्याला वन्समोअर मिळाला.तीन व्याधींनी पीडित दादूच्या गणपतीने दाद मिळवली….इतनी शक्ती हमे दे न दाता..या गीताच्या बोबड्या बोलांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणलं.गेल्या अनेक वर्षांपासून सेवालयाशी जोडल्या गेलेल्या प्रसिद्ध गायक रोहित राऊतने शोची रंगत वाढवली…मी सेवालयासाठी कधीच पाहुणा असणार नाही, हे रोहितचं आश्वासन त्याच्या सामाजिक बांधिलकीची खात्री देणारं होतं.बालकलाकार तनुजा शिंदेच्या लावणीने बहार आणली.अर्जूनच्या मिमिक्री ने जोरदार टाळ्या मिळवल्या.सगळ्या कलाकारांनी उत्तम नृत्याभिनय करून,त्यांच्या गुणवत्तेची खात्री पटवली.ज्योतिबा बडे यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट सुत्रसंचालन केलं.
Happy music Showच्या तयारीसाठी स्नेहा शिंदे घेत असलेल्या परिश्रमाला तोड नाही.स्नेहाची आई,बहिण,वडिल शिंदे सर असं सगळ्या कुटुंबाचंच या कामासाठी योगदान लाभलयं.सगळं कुटुंबच सेवाभावी बनलयं.
सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांच्या आत्मविश्वासाचा मी नेहमीच अनुभव घेतो.यावेळीही तेच घडलं.सगळं ओढून नेण्याची त्यांची क्षमता अफाट आहे.त्यामुळं अपयश त्यांच्या वाटेला येत नाही.
नवाकाळच्या मालक,संपादक जयश्री खाडिलकर यांनी शिवाजी नाट्यमंदिर बुक केलं.प्रवासाचा खर्च,निवास,जेवण व मुलांना मुंबई दर्शन घडवून आणलं.याबद्दल त्यांचं कौतूक करावं तेवढं कमी आहे.मुंबईतील पहिला कार्यक्रम होण्याचं श्रेय त्यांनाच. मात्र कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांचे हात लाभले.सेवालयाचं हे काम आपलं समजून अनेक मित्रांनी धावपळ केली.त्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नसलं तरी,त्यांनी घेतलेल्या मेहनतीची मला पुरेपूर जाणीव आहे.केवळ त्यांच्या पडद्यामागच्या भूमिकेमुळेच कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
मुंबईत कार्यक्रम होतोय,यातच सगळ्यांना आनंद होता.हँपी इंडियन व्हिलेज प्रकल्पाला मदत मिळते की नाही, याबाबत अनिश्चितता होती.आमचा पूर्वतयारीचा दौरा उपयुक्त ठरला.सुयोग टेलिमेटिक्सचे प्रमुख व मुळचे लातूर निवासी शिवशंकर लातूरे यांनी त्यांच्या कंपनीतर्फे ५लाखाचा भरीव निधी संचालक लिना पाटील यांच्या हस्ते दिला.मराठवाडा मित्र मंडळ नवी मुंबईच्या मित्रांनी कमी वेळेत धावाधाव करून ८०हजाराचा निधी गोळा करून दिला.म्हाडा कर्मचारी सेवालय मित्रमंडळाचे स्वामी यांनीही ५०हजाराचा निधी दिला.सँम्सन सपोर्ट&अँडव्हायझरी लि. या कंपनीने ५१ हजाराचा निधी दिला.मुळचे लातूरचे मुंबईस्थित उद्योजक सतिष खाडप यांनी ११ हजाराची देणगी व परतीच्या प्रवासात मुलांना जेवण दिलं.कार्यक्रमस्थळी अनेकांनी उत्स्फूपणे हजार,पाचशे रूपयांच्या देणग्या दिल्या.एकंदरीत मुंबईतील या पहिल्याच कार्यक्रमाने हँपी इंडियन व्हिलेज प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी भरीव मदत मिळवून दिली.हा शो बघून काही मित्रांनी उपनगरात शो आयोजित करण्याची तयारी दर्शवली.भविष्यात उपनगरात हँपी म्युझिक शोचे कार्यक्रम होतील,हे या शो चे मोठे यश म्हणावे लागेल.
काल,रविवारी सेवालयातील मुलांनी पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेतला.गेटवेवर बोटिंग, चौपाटीवरचं थ्रील,मस्त्यालय असं बहुरुपी मुंबईचं दर्शन घेतलं.पोरांनी मुंबई पाहिली…ही सगळ्यात मोठी देणगी.तिचं मोल नाही.मुंबईच्या या शोनं सेवालयाची ओळख आणखी व्यापक केली.