सेवालयाला विद्यार्थी बससाठी आर्थिक मदत हवी

महाराष्ट्र विश्व न्यूज, ( लातूर) – लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथील सेवालय व हँपी इंडियन व्हिलेजबद्दल Happy indian village(HIV) ही संस्था आहे. गेल्या ११वर्षांपासून जन्मजात एचआयव्ही-एडस संक्रमित बालकांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी या संस्थेचे संस्थापक रवी बापटले कार्यरत आहेत. या संस्थेची सुरूवात झाली तेव्हा ही मुलं जगतील की नाही, ती फार काळ जगणार नाहीत, अशीच स्थिती होती. जगण्याची ही लढाई सोपी नव्हती. आईनं आपल्या एकुलत्या एक लेकाचा ज्या जिव्हाळ्यानं, काळजीनं सांभाळ करावा, तसं रवीनं या छोट्या बालकांचं संगोपन केलं. योग्य औषधोपचार, सकस अन्न आणि आरोग्यदायी वातावरणामुळं चमत्कार घडला. बघता बघता मुलं मोठी झाली. शाळेला जाऊ लागली. सगळीच मुलं सामान्य मुलांप्रमाणं आनंदी जीवन जगताहेत.२ ५विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केलाय. लातूर येथील विविध महाविद्यालयात इंजिनिअरिंग, आयटीआय, कॉम्प्युटर सायन्स, बी.एस.डब्ल्यू, कला, वाणिज्य अशा विविध शाखात या मुलांनी प्रवेश घेतलाय. या विद्यार्थ्यांच्या हसेगाव-लातूर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय. वाहतूक योग्य रस्त्याचा विचार केला तर, लातूर -हसेगाव अंतर सुमारे २०किलोमीटर आहे. हसेगावहून कोणतीही सोयीची वाहनं नाहीत. शिवाय सेवालयातील या मुलांची कॉलेजेस लातूरात वेगवेगळ्या भागात आहेत. त्यांच्या वेळाही सारख्या नाहीत. त्यामुळे या सगळ्या मुलांना त्यांच्या वेळेवर त्यांच्या कॉलेजमध्ये पोचवणं हे काम अवघड बनले आहे.

सगळ्या पर्यायांचा साधक-बाधक विचार केल्यानंतर संस्थेने ३०-३६सीटरची बस विकत घेणं हाच पर्याय योग्य असल्याचं लक्षात आलं. सुमारे २०लाखाचा खर्च यासाठी येतोय. हा खर्च संस्थेसाठी डोंगराएवढा मोठा आहे. पण याला दुसरा पर्यायही नाही. आजपर्यंत दानशूर व्यक्तींच्या मदतीतूनच सेवालयाने असे अनेक उपक्रम तडीस नेले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनू पाहणाऱ्या या महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमालाही दानशूर, संवेदनशील नागरीक मदत करतील या खात्रीवरच सेवालयाने आवाहन केले आहे. मुलांच्या स्कूल बससाठी आपण व्यक्तीगत, संस्थेमार्फत, व्यावसायिक उपक्रमामार्फत जेवढी शक्य आहे तेवढी आर्थिक मदत करावी व मृत्युच्या दाढेतून बाहेर येऊन आनंददायी जगू पाहणाऱ्या या लढवय्यांच्या पाठिशी आपलं सक्रीय योगदान द्यावं..आपण दिलेल्या पै न् पै चा योग्य विनियोग होईल. आपण दाते म्हणून कधीही येऊन हा हिशोब पाहू शकता. खालील बँक खात्यावर किंवा प्रत्यक्ष भेटून मदत करू शकता. त्याची रीतसर पावती मिळेल. सेवालयाला दिली जाणारी मदत “80Gअंतर्गत “कर सवलतीस पात्र आहे. समाजातील दानशूर लोकांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आली आहे.

Source: dailyhunt.in

link: https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra+vishva+news-epaper-mahavish/sevalayala+vidyarthi+basasathi+aarthik+madat+havi-newsid-90661004