सध्याच्या पिढीबद्दल, या पिढीच्या सामाजिक जाणीवांबद्दल सार्वजनिक पातळीवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. अशा वातावरणात आमचे सामाजिक भान कसे टिकून आहे, सामाजिक कार्यात आपल्या पातळीवर काय मदत करता येईल, याचे उदाहरण इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी समोर ठेवले आहे. एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ‘सेवालय’ या संस्थेची वेबसाइट विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. यामुळे सेवालय संस्थेला आता ऑनलाइन पद्धतीने देणगी स्वीकारता येणार आहे.
झील इन्स्टिट्यूटमधील इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. स्वांतत्र्य दिनानिमित्त याच दिवशी एक कार्यक्रम आयोजिला आहे. यामध्ये सेवालय संस्थेतील मुला-मुलींच्या कलागुणांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी संस्थेला देण्यात येणार आहे. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात वेबसाइटचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती वैष्णवी शिंदे, अमरसिंग जमादार, विशाल लोकम व श्वेता पिसाळ या विद्यार्थ्यांनी ‘मटा’ला दिली.

‘लातूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये असून त्यांच्या बोलण्यातून सेवालय या संस्थेचा उल्लेख बऱ्याचदा आला. या संस्थेसाठी मदत म्हणून निधी संकलनाची कल्पना पुढे आली. त्याचाच भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन sevalay.org ही वेबसाइट तयार केली आहे. आम्ही अद्ययावत वेबसाइट तयार केली असून संस्थेची अधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. वेबसाइटमुळे संस्थेला ऑनलाइन देणगी स्वीकारता येणार आहे,’ असे वैष्णवीने सांगितले. ‘पंधरा विद्यार्थ्यांनी एक महिन्यात वेबसाइटचे काम पूर्ण केले. स्वातंत्र्यदिनापासून ही वेबसाइट सर्वांना पाहता येईल. आम्ही विद्यार्थ्यांनी आमच्या पातळीवर काही वाटा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. वेबसाइटचे यापुढील काम आम्हीच पाहणार आहोत,’ असे वैष्णवी म्हणाली. ‘सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाविषयी, संस्थेविषयी तसेच वेबसाइटविषयी विविध ठिकाणी माहिती देत आहेत,’ असे विशालने सांगितले.

लातूर जिल्ह्यात हसेगाव येथे सेवालय संस्थेचे काम दहा वर्षांपासून सुरू आहे. सध्या ८० एचआयव्हीग्रस्त मुले-मुली आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघर्ष करावा लागला. आजही आम्हाला विरोध केला जातो. लोकांच्या मदतीवर संस्था सुरू आहे. एकदा वेबसाइट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण, अडीअडचणींमुळे हे काम राहून गेले. इजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमुळे पहिल्यांदाच वेबसाइट तयार झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मदत केली असून त्यांचे सामाजिक भान यातून दिसते.

Source: Maharshtra Times

Link: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/students-service-center-website/articleshow/65389494.cms