‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांचे आयुष्य सावरणारे ‘सेवालय’

प्रा. रवी बापटले यांनी लातूरमधील औसा येथे एड्सग्रस्त अनाथ मुलांना आधार देण्यासाठी स्थापन केलेले ‘सेवालय’ हे केंद्र अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज (एक डिसेंबर) जागतिक एड्स दिन आहे. त्या निमित्ताने ‘लेणे समाजाचे’ सदरात पाहू या ‘सेवालय’ या संस्थेबद्दल… 

पांढरी कफनी, पांढरा सदरा आणि पांढरा गमछा ल्यालेला तो, अंगावर आलेल्या एका भयानक वास्तवाला सामोरे जात मनाशी काहीतरी खूणगाठ बांधतो आणि अनाथ ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांचा ‘बाप’ होतो. यातूनच उभा राहतो ‘सेवालय’सारखा आधारवड, जो आज या मुलांचं आयुष्य सावरण्याचं काम करत आहे. ही कहाणी आहे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रवी बापटले यांची…. ज्यांच्या या अभूतपूर्व समाजकार्याची दखल जगाने घेतली आहे.

उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा या गावात एका शेतकरी कुटुंबात रवी यांचा जन्म झाला. बालपणापासूनच देशसेवा करण्याचं स्वप्न पाहिलेल्या रवी यांनी याबाबतचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर समाजसेवेचा भाग म्हणून पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेऊन, लातूरच्या एका महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं. परंतु समाजकार्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. काही तरुणांना सोबत घेऊन, शहरातील विविध भागांत त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यातूनच त्यांनी ‘आम्ही सेवक’ नावाने संस्थेची नोंदणी केली. कालांतराने यापेक्षाही विस्तारित स्वरूपात समाजकार्य करता यावे, या विचाराने ‘सेवालय’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. अचानकपणे सामोरा आलेला एक भयानक प्रसंग त्यांच्या आयुष्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरला.

२००६मध्ये रवी बापटले राहत असेलल्या गावातील एक जोडपे एड्स संक्रमणाने मरण पावले. त्या जोडप्याच्या चार वर्षांच्या मुलालाही एड्सची लागण झाली होती. नातेवाईकांनी त्या मुलाला एका पडक्या जागी टाकून दिले. रवी यांना हे समजल्यावर ते त्याला पाहायला गेले. त्या वेळी त्यांच्यासमोरचे दृश्य भयंकर होते. त्या मुलाचे शरीर किड्या-मुंग्यांनी पोखरून टाकले होते. त्याला हात लावणे दूरच, लांबून पाहण्याचीही कोणाची तयारी नव्हती. काही मित्रांना सोबत घेऊन रवी यांनी त्या मुलाचा अंत्यविधी केला. त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला, की अशा ‘एचआयव्ही’ग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करायचे. याच प्रेरणेतून आणि निर्धारातून ‘सेवालय’च्या कामाची खरी सुरुवात झाली. ‘समोर जीवन असताना ते पाहून जगणं आणि समोर मृत्यू असताना ते पाहून जगणं, यात खूप फरक आहे.., यामुळेच या कार्याकडे वळलो..,’ असं रवी बापटले सांगतात.

लातूरपासून काही किलोमीटर अंतरावरील औसा, हासेगाव या गावाच्या शिवारात रवी बापटले यांनी ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांसाठी आश्रम सुरू केला आहे. सुरुवातीला मुख्य अडचण होती ती जागेची. जागा मिळाली तरच पुनर्वसन प्रकल्प सुरू करणे शक्य होते. रवी बापटले यांच्या एका मित्राने हासेगाव येथील आपली साडेसहा एकर जमीन ‘आम्ही सेवक’ संस्थेला दिली. त्यानंतर ‘सेवालय’चे काम सुरू झाले. ‘एचआयव्ही’ग्रस्त, एड्सबाधितांविषयी समाजात आजही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत एका ग्रामीण भागात हे काम करणे तसे फारच अवघड होते. ग्रामस्थांच्या विरोधाला समोरं जात, रवी यांनी हळूहळू काम सुरू केलं. संस्थेचं काम पाहून समाजातील दानशूर व्यक्ती संस्थेच्या पाठी उभ्या राहू लागल्या. दोन मुलांपासून सुरू झालेलं सेवालय सध्या ६५ मुला-मुलींना राहण्या-खाण्यासहित शिक्षणही देतं. पहिली पासून बारावी पर्यंतची, म्हणजेच सहा वर्षांपासून १६-१७ वर्षांपर्यंतची मुलं सध्या तिथं आहेत.
पालकत्व योजना : 
‘सेवालय’मधील विद्यार्थ्यांचे पालक होऊन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. यानुसार ‘सेवालय’मध्ये विद्यार्थ्यांचे पालकत्व ही योजना सुरू करण्यात आली आहे. एका मुलाच्या पालकत्वासाठी दरमहा दीड हजार रुपये देणगी घेतली जाते. या योजनेला चांगला प्रतिसाद आहे. इतर हितचिंतकही आपापल्या परीने देणगी देऊन, या कार्याला हातभार लावत असतात.
हॅपी इंडियन व्हिलेज (Happy Indian Village – HIV): 
सुरुवातीच्या काळात एड्सवरील उपचारपद्धती फारशी प्रगत आणि उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्ण फार तर तीन ते चार वर्षं जगत असे; मात्र बदलत्या काळानुसार अत्याधुनिक औषधोपचार पद्धतीमुळे एड्सबाधित व्यक्तीही सामान्य माणसाचे आयुष्य जगू शकत आहे. हेच चित्र ‘सेवालय’मध्येही पाहायला मिळते. पाचवी-सातवीत ‘सेवालया’त आलेली मुले आता १८ वर्षांचा टप्पा ओलांडून तारुण्यात प्रवेश करत आहेत. या तरुण मुला-मुलींना समाजात सामावून घेताना त्यांना काय कसरत करावी लागते, कोणकोणत्या समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहतात, या प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यातूनच रवी बापटले यांनी ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ची संकल्पना मांडली. एक डिसेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. ‘सेवालय’मध्ये असणारी एड्सबाधित मुलं स्वतःच्या पायावर उभी रहावीत, ती समाजात काहीतरी बनवीत, ती मुलं इथं आनंदानं जगावीत अशी यामागची संकल्पना आहे. ‘सेवालय’पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेली जमीन यासाठी घेण्यात आली आहे.
हॅपी म्युझिक शो :
एक डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मूलन दिवस. या दिवशी भारतासह जगभर विविध कार्यक्रम राबविले जातात. आजही एड्सबाधित  रुग्णांबद्दलचे समाजातील गैरसमज कमी होताना दिसत नाहीत. २००७पासून ‘सेवालया’च्या वतीने एड्स जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. यासाठी ‘सेवालया’तील मुलांकडून एक विशेष कार्यक्रम राबवला जातो. ‘हॅपी म्युझिक शो’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या माध्यमातून जनजागृती केली जाते. महाराष्ट्राच्या काही प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत याचे ४१ प्रयोग झाले आहेत. यंदा प्रथमच लातूर महानगरपालिकेच्या वतीने एक डिसेंबरच्या पूर्वसंध्येला टाउन हॉलच्या भव्य मैदानावर ‘हॅपी म्युझिक शो’चे आयोजन करण्यात आले होते.